जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

पांचाळ शौर्य व कमरान शेख यांचा क्वाड स्केटिंग प्रकारात प्रथम क्रमांक
वसमत (प्रतिनिधी) — हिंगोली येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये वसमत येथील पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत पांचाळ शौर्य याने ११ वर्षांखालील वयोगटात, तर कमरान शेख याने १४ वर्षांखालील वयोगटात क्वाड स्केटिंग प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रालाही विशेष महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती आणि स्पर्धात्मक भावना विकसित व्हावी, यासाठी शाळेच्या वतीने सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.
या यशामागे कोच एम. ए. बारी, फिरोज पठाण आणि क्रीडा शिक्षक आकाश अग्रवाल यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. शाळेच्या प्राचार्या जयश्री देवडा यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे संचालक एफ. एफ. कच्छी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातही त्यांनी क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनीही दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूलच्या या दुहेरी यशामुळे वसमतच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


